Saturday, January 22, 2011

आग ओकते आभाळ

आग ओकते आभाळ
पिळ काळजाला पडे.
काळ्या आईच्या अंगात
ज्वर दिसामासी चढे.


तिचा करपतो जीव
अंग लाही लाही होई.
माझा फाटका पदर
तिला झाकू कसं बाई?


तिच्या भेगाळल्या देही
सूर्य घालतो थैमान.
विहीरही पाणी मागे
लागे रानाला तहान.


सपासप वार करी
उन्हं आसूड ओढून.
मीठ जखमेला चोळी
रानी वणवा होऊन.


वीज होउनीया सूर्य
पान्हा नदीचा गं जाळी.
काळ्या आईच्या गर्भात
निवडूंग जन्मा येई.


काटा उन्हाचा टोचता
डोळ्यामध्ये पूर येई.
त्याच्या खारट पाण्याला
कवडीचं मोल नाही.


धग झोपडीला लागे
पडे चूल थंडगार.
भूक पोटात नाचते
घास मिळेना उधार.


सांग सांगरे आभाळा
तुझी माया का आटते?
उभ्या संसाराची चिता
भर उन्हात पेटते.


संचिता कारखानीस.










तिला पाहिले मी

तिला पाहिले मी फुले माळताना.
खुल्या चिंब केसात गंधाळताना.
फुलांचा नवा गंध कुरवाळताना.


तिला पाहिले मी कळ्या वेचताना.
कळ्यांच्या पहाऱ्यात शृंगारताना.
फुलांच्या विचारात रेंगाळताना.


तिला पाहिले मी मला पाहताना.
मला पाहुनी लाजुनी हसताना.
गुलाबी नशा देहभर सांडताना.


तिला पाहिले आसवे ढाळताना.
दिवास्वप्न भंगून चूरगाळताना.
सुरांना उरातून झिडकारताना.


तिला पाहिले मी फुले छाटताना.
फुलांना निखाऱ्यात भिरकावताना.
उभा देह ज्वाळात सुलगावताना.


संचिता कारखानीस.





माणूस होऊन जगून बघ

संगमरवरी देव्हारयातून
थोडं खाली उतरून बघ.
धुपादिपातून बाहेर पडून
थोडं मोकळं फिरून बघ.

रेशनसाठी तासनतास
रांगेमध्ये थांबून बघ.
८.१८ च्या लोकलमध्ये
तुही कधी चढून बघ.

भूक भूक काय असते?
थोडं उपाशी राहून बघ.
थेंब थेंब पाण्यासाठी
मैलन मैल चालून बघ.

भाकर तुकडा कसा लागतो
गरिबाघरी चाखून बघ.
कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये
फाटकी चादर पांघरून बघ.

गळक्या छपराखाली बसून
तूही तळं पिऊन बघ.
घास नसता, पाणी पिऊन
तूही तसंच निजून बघ.

चिमटा काढून पोटाला तू
नाणं नाणं साचवून बघ.
आभाळ फाटता डूचमळणाऱ्या
घरातून तू वाहून बघ.

दिवाळसणाला अंधाराच्या
झोपडीत एकदा राहून बघ.
अर्ध्या भाकरीसाठी तूही
एकदा हात पसरून बघ.

इंच इंच जागेसाठी
आयुष्य गहाण टाकून बघ.
वितभर कपड्यासाठी
अब्रू तारण ठेऊन बघ.

स्फोटानंतर विस्कटलेली
मनं आतून पाहून बघ.
तुझ्याच लेकरांच्या तीरडीला
खांदा एकदा देऊन बघ.

रोजचं मरण झेलण्यासाठी
जन्म एकदा घेऊन बघ.
खरंच सांगते देवा एकदा
माणूस होऊन जगून बघ.

माणूस होऊन जगून बघ.......

संचिता कारखानीस.

तुझ्या रूपाने प्याला भरता

तुझ्या रूपाने प्याला भरता.
डोळ्यांवरती नशा उतरते.
थेंब थेंब हृदयात सांडुनी
ओठांवरती गझला लिहीते.


एक घोट दिलखेच अदांचा.
एक तुझ्या मदमस्त बटांचा.
गालांवरल्या धूंद खळ्यांचा
ओठांमधल्या कुन्दकळ्यांचा.


एक उसळत्या आवेगाचा.
एक गुंतल्या दोन मनांचा.
देहावरल्या मोरपिसाचा.
स्पर्शामधल्या पैलतीराचा.


घोट घोट ओठात रिचवता.
रदीफ, काफिया बहरून येतो.
चाखून धुंदी ओठांमधली
मतला थोडा बहकत जातो.


डूचमळता तो प्याला किंचीत
तुझ्या रुपाची नशा उतरते.
रित्या जाहल्या काळजातले
जहरी स्पंदन श्वास जाळते.


उरते केवळ खारट पाणी
डोळ्यांच्या प्याल्यात उतरते.
मतल्यावरती बरसत जाता
गझलेचीही नशा उतरते.


गझल होऊनी थोडी हळवी
शब्दांच्या अश्रूंनी रडते.
पुन्हा नव्याने हसण्यासाठी
ओठांच्या प्याल्यात उतरते.


संचिता कारखानीस.

गुलाब खुडूनी ओठांमधला

गुलाब खुडूनी ओठांमधला रंग गुलाबी घेऊन गेला.
फुंकर घालून ओठांवरती गंध कळ्यांना देऊन गेला.

ओठ टेकता ओठांवरती क्षण कायमचा थिजून गेला.
ओठांमधल्या दवबिंदूंना टिपून घेता भिजून गेला.

मोरपिसापरी तरल होऊनी देहावरती फिरून गेला.
गर्भरेशमी मिठीत घेउनी मला बावरे करून गेला.

ओठांमधल्या डाळींबाची अवीट गोडी चाखून गेला.
लालचुटुक रंगात न्हाउनी मिठास थोडी घोळून गेला.

श्वास मल्मली चंदन चंदन श्वासावरती झिजून गेला.
अधरावरती सांडत जाता मलाच चंदन करून गेला.

संचिता कारखानीस.

तुझ्यावर माझा जीव

तुझ्यावर माझा जीव जडायला नको होता.
पाकळीत देह सारा फुलायला नको होता.

वर धरा, खाली मेघ... वाटे सारे मृगजळ
दिस दिस तुझ्यासाठी, सख्या जळे माझा जीव.
जळताना तुझा जीव झुरायला नको होता.
तुझ्यावर माझा जीव ....

तुझे श्वास, माझे श्वास... गुंतलेली चांदरात.
चांदण्यात वेडेपिसे मन होई पारिजात.
गंधाळला त्याचा सडा पडायला नको होता.
तुझ्यावर माझा जीव ....

चांदण्याचे तुझे भास, धुंद झाला नदीकाठ.
स्पंदनांची बरसात, मधाळले माझे ओठ.
ओठातला सोनचाफा खुडायला नको होता.
तुझ्यावर माझा जीव ....

स्पर्श सारे बोलणारे, बोलताना छळणारे.
स्पर्शताना देहभर छळवाद मांडणारे.
छळवादी तुझा स्पर्श घडायला नको होता.
तुझ्यावर माझा जीव ....

संचिता कारखानीस.

माझी आई

माझ्या माहेरा अंगणी
खुले केवडा चंदनी.
त्याच्या गात्रात रुजली
आहे माझी आई.

माझ्या माहेरा दारात
सजे सडा नि रांगोळी.
त्याच्या रंगात भिनली
आहे माझी आई.

माझ्या माहेरा कौलांना
किती किती गं झरोके.
त्याच्या कोवळ्या उन्हात
असे माझी आई.

माझ्या माहेरा गोठ्यात
आहे कपिला साजिरी.
तिच्या दुधाळ पान्ह्यात
असे माझी आई.

माझ्या माहेरा खळ्यात
असे विहीर गं मोठी.
तिच्या अमृताच्या ओठी
हसे माझी आई.

माझ्या माहेरा शेतात
डुले सोनसळी पिक.
त्याच्या मोत्याच्या दाण्यात
असे माझी आई.

माझ्या माहेरा दिव्यात
तेला तुपाच्या गं वाती.
तेथे उजळत्या ज्योती
दिसे माझी आई.

माझ्या माहेरा गाभ्यात
असे विठाई माउली.
पण माझ्या गं राउळी
वसे माझी आई.

संचिता कारखानीस.

निळ्या अक्षता

पहाट ओली ओलेत्याने
मेघांवरती दव पांघरते.
सोनसळी किरणांच्या ओठी
थेंब टपोरे सांडत जाते.

बरसत, झिरपत जाते काही
अंगणातल्या मातीमध्ये.
गर्भरेशमी धुक्यास सारून
कुंदकळ्यांच्या गात्रांमध्ये.

आभाळाचा निळा पसारा
सागर सारा कवेत घेतो.
टिपून घेता थेंबांनाही
थोडा थोडा ओला होतो.

बांधून पैंजण पायांमध्ये
अवघी अवनी अल्लड होते.
थेंब थेंब पायात बांधुनी
डोहावरती थिरकत जाते.

नादमयी थेंबांच्या कंठी
गानकोकिळा साद घालते.
पानांवरती बरसत जाता
संगीत हिरवे कानी येते.

मेघ सावळा दोहातांनी
निळ्या अक्षता उधळत जातो.
सृष्टीच्या पदरावर हिरवा
मोर नाचरा गिरवत जातो.

संचिता कारखानीस.

Friday, January 21, 2011

अंतरी विझल्या व्यथा (गझल)

अंतरी विझल्या व्यथा (गझल)
गालगा ललगा लगागा गालगा ललगा गागा


आसवे ढळताच गाली कोरड्या भिजल्या व्यथा.
पेटत्या सरणात आता पेटुनी थिजल्या व्यथा.

मोगरा खुलताच ओठी लाजली हळवी नीशा.
ती नशा भिनताच गात्री कोवळ्या निजल्या व्यथा.

हुंदका फुटताच पानी जाहल्या हिरव्या दीशा.
त्या दिशा रुजवून दारी अंगणी भिनल्या व्यथा.

फाटक्या पदरात मी ही पोसते परक्या जीवा.
गोडवा सिमटून पोटी हासुनी मिटल्या व्यथा.

सोडूनी उपभोग आता लाविला भगवा टीळा.
गुंतुनी वणव्यात त्याच्या चंदनी झिजल्या व्यथा.

सावळ्या तिमिरात का रे काजळे जळता दीवा?
काजळी बिलगून देही अंतरी विझल्या व्यथा.

संचिता कारखानीस.

तुझ्या पापण्या पांघरायच्या आहेत

तुझ्या पापण्या पांघरायच्या आहेत

तुझ्या पापण्या पांघरायच्या आहेत,
असं नेहमी म्हणायचास.
आणि म्हणता म्हणताच पापणीमध्ये
अलगद येऊन निजायचास.

तेव्हा पापण्या माझ्या कशा
हलक्या हलक्या होऊन जायच्या.
तुला सामावून घेता घेता
मला पिसं पिसं करून जायच्या.

माझ्या पापणीत तुझी स्वप्नं
फेर धरून नाचायची.
तुझ्या स्वप्नात माझी स्वप्नं
मेण होऊन वितळायची.

तुझ्या स्वप्नांचं मोरपीस
फिरत रहायचं पापण्यांवर.
शहारलेला रंग निळा
भिनत जायचा देहावर.

स्वप्नाळलेली माझी पापणी
मेघ होऊन जायची.
जडावलेल्या तुझ्या पापणीला
थेंब देऊन जायची.

अजूनही माझ्या पापणीचा
मेघ आहे डवरलेला.
थेंब थेंब साचून साचून
काठोकाठ ओथंबलेला.

बरसायचंय त्याला आताही
तुझ्या भीजऱ्या काठावर.
मोरपीस होऊन फिरायचंय.
थरथरणाऱ्या पापण्यांवर.

पण आताशा तुझ्या पापण्या
फक्त स्वप्नातच भेटतात.
तिथेदेखील त्या माझ्याशी
परक्यासारख्या वागतात.

वाट पहातेय तुझी मी
माझ्या पापणीत निजण्याची.
तुझ्या पापण्या पांघरायच्या आहेत
असं पुन्हा म्हणण्याची.

संचिता कारखानीस.