Saturday, March 5, 2011

खुणा


रुपेरी खुणा पाहिल्या मी उशाला
तिचा भास देहावरी सांडलेला.
काळे मणी काही उरलेच मागे
हिरवा चुडा तोही भेगाळलेला.

श्वासातली उब होती जराशी
मनाच्या तळाशी तिने ठेवलेली.
कळी मोगऱ्याचीच होती कडेला
तिच्या धूंद गजऱ्यामधे गुंतलेली.

क्षितीजावरी साद घालून गेला
ओठातला रंग श्रुन्गारलेला.
हृदयावरी नाद कोरून गेला
पायातला साज झंकारलेला.

कुंकू तिच्या भाळी मी रेखीलेले
होते जरा या उरी सांडलेले.
डोळ्यातल्या काजळाचे उखाणे
तिच्या खोल डोळ्यात मी वाचलेले.

श्वासातला तोल ढळलाच होता
तरी जीर्ण देहातही आस होती.
डवरला निळा मेघ डोळ्यात माझ्या
तिच्या अंतरी चिंब बरसात होती.

कळा लागल्या हाय माझ्या जीवाला
तिचा स्पर्श बर्फाहुनी थंड होता.
निसटता तिचा हात हातात घेता
तिचा श्वास देहातुनी मुक्त होता.

संचिता कारखानीस.

Saturday, January 22, 2011

आग ओकते आभाळ

आग ओकते आभाळ
पिळ काळजाला पडे.
काळ्या आईच्या अंगात
ज्वर दिसामासी चढे.


तिचा करपतो जीव
अंग लाही लाही होई.
माझा फाटका पदर
तिला झाकू कसं बाई?


तिच्या भेगाळल्या देही
सूर्य घालतो थैमान.
विहीरही पाणी मागे
लागे रानाला तहान.


सपासप वार करी
उन्हं आसूड ओढून.
मीठ जखमेला चोळी
रानी वणवा होऊन.


वीज होउनीया सूर्य
पान्हा नदीचा गं जाळी.
काळ्या आईच्या गर्भात
निवडूंग जन्मा येई.


काटा उन्हाचा टोचता
डोळ्यामध्ये पूर येई.
त्याच्या खारट पाण्याला
कवडीचं मोल नाही.


धग झोपडीला लागे
पडे चूल थंडगार.
भूक पोटात नाचते
घास मिळेना उधार.


सांग सांगरे आभाळा
तुझी माया का आटते?
उभ्या संसाराची चिता
भर उन्हात पेटते.


संचिता कारखानीस.










तिला पाहिले मी

तिला पाहिले मी फुले माळताना.
खुल्या चिंब केसात गंधाळताना.
फुलांचा नवा गंध कुरवाळताना.


तिला पाहिले मी कळ्या वेचताना.
कळ्यांच्या पहाऱ्यात शृंगारताना.
फुलांच्या विचारात रेंगाळताना.


तिला पाहिले मी मला पाहताना.
मला पाहुनी लाजुनी हसताना.
गुलाबी नशा देहभर सांडताना.


तिला पाहिले आसवे ढाळताना.
दिवास्वप्न भंगून चूरगाळताना.
सुरांना उरातून झिडकारताना.


तिला पाहिले मी फुले छाटताना.
फुलांना निखाऱ्यात भिरकावताना.
उभा देह ज्वाळात सुलगावताना.


संचिता कारखानीस.





माणूस होऊन जगून बघ

संगमरवरी देव्हारयातून
थोडं खाली उतरून बघ.
धुपादिपातून बाहेर पडून
थोडं मोकळं फिरून बघ.

रेशनसाठी तासनतास
रांगेमध्ये थांबून बघ.
८.१८ च्या लोकलमध्ये
तुही कधी चढून बघ.

भूक भूक काय असते?
थोडं उपाशी राहून बघ.
थेंब थेंब पाण्यासाठी
मैलन मैल चालून बघ.

भाकर तुकडा कसा लागतो
गरिबाघरी चाखून बघ.
कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये
फाटकी चादर पांघरून बघ.

गळक्या छपराखाली बसून
तूही तळं पिऊन बघ.
घास नसता, पाणी पिऊन
तूही तसंच निजून बघ.

चिमटा काढून पोटाला तू
नाणं नाणं साचवून बघ.
आभाळ फाटता डूचमळणाऱ्या
घरातून तू वाहून बघ.

दिवाळसणाला अंधाराच्या
झोपडीत एकदा राहून बघ.
अर्ध्या भाकरीसाठी तूही
एकदा हात पसरून बघ.

इंच इंच जागेसाठी
आयुष्य गहाण टाकून बघ.
वितभर कपड्यासाठी
अब्रू तारण ठेऊन बघ.

स्फोटानंतर विस्कटलेली
मनं आतून पाहून बघ.
तुझ्याच लेकरांच्या तीरडीला
खांदा एकदा देऊन बघ.

रोजचं मरण झेलण्यासाठी
जन्म एकदा घेऊन बघ.
खरंच सांगते देवा एकदा
माणूस होऊन जगून बघ.

माणूस होऊन जगून बघ.......

संचिता कारखानीस.

तुझ्या रूपाने प्याला भरता

तुझ्या रूपाने प्याला भरता.
डोळ्यांवरती नशा उतरते.
थेंब थेंब हृदयात सांडुनी
ओठांवरती गझला लिहीते.


एक घोट दिलखेच अदांचा.
एक तुझ्या मदमस्त बटांचा.
गालांवरल्या धूंद खळ्यांचा
ओठांमधल्या कुन्दकळ्यांचा.


एक उसळत्या आवेगाचा.
एक गुंतल्या दोन मनांचा.
देहावरल्या मोरपिसाचा.
स्पर्शामधल्या पैलतीराचा.


घोट घोट ओठात रिचवता.
रदीफ, काफिया बहरून येतो.
चाखून धुंदी ओठांमधली
मतला थोडा बहकत जातो.


डूचमळता तो प्याला किंचीत
तुझ्या रुपाची नशा उतरते.
रित्या जाहल्या काळजातले
जहरी स्पंदन श्वास जाळते.


उरते केवळ खारट पाणी
डोळ्यांच्या प्याल्यात उतरते.
मतल्यावरती बरसत जाता
गझलेचीही नशा उतरते.


गझल होऊनी थोडी हळवी
शब्दांच्या अश्रूंनी रडते.
पुन्हा नव्याने हसण्यासाठी
ओठांच्या प्याल्यात उतरते.


संचिता कारखानीस.

गुलाब खुडूनी ओठांमधला

गुलाब खुडूनी ओठांमधला रंग गुलाबी घेऊन गेला.
फुंकर घालून ओठांवरती गंध कळ्यांना देऊन गेला.

ओठ टेकता ओठांवरती क्षण कायमचा थिजून गेला.
ओठांमधल्या दवबिंदूंना टिपून घेता भिजून गेला.

मोरपिसापरी तरल होऊनी देहावरती फिरून गेला.
गर्भरेशमी मिठीत घेउनी मला बावरे करून गेला.

ओठांमधल्या डाळींबाची अवीट गोडी चाखून गेला.
लालचुटुक रंगात न्हाउनी मिठास थोडी घोळून गेला.

श्वास मल्मली चंदन चंदन श्वासावरती झिजून गेला.
अधरावरती सांडत जाता मलाच चंदन करून गेला.

संचिता कारखानीस.

तुझ्यावर माझा जीव

तुझ्यावर माझा जीव जडायला नको होता.
पाकळीत देह सारा फुलायला नको होता.

वर धरा, खाली मेघ... वाटे सारे मृगजळ
दिस दिस तुझ्यासाठी, सख्या जळे माझा जीव.
जळताना तुझा जीव झुरायला नको होता.
तुझ्यावर माझा जीव ....

तुझे श्वास, माझे श्वास... गुंतलेली चांदरात.
चांदण्यात वेडेपिसे मन होई पारिजात.
गंधाळला त्याचा सडा पडायला नको होता.
तुझ्यावर माझा जीव ....

चांदण्याचे तुझे भास, धुंद झाला नदीकाठ.
स्पंदनांची बरसात, मधाळले माझे ओठ.
ओठातला सोनचाफा खुडायला नको होता.
तुझ्यावर माझा जीव ....

स्पर्श सारे बोलणारे, बोलताना छळणारे.
स्पर्शताना देहभर छळवाद मांडणारे.
छळवादी तुझा स्पर्श घडायला नको होता.
तुझ्यावर माझा जीव ....

संचिता कारखानीस.